नांदेड - राजस्थानातील कोटा, तेलंगणातील हैदराबादसह राज्यातील पुणे शहरात संचारबंदीमुळे अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांचे पालक चिंतेत सापडले आहेत. आपल्या मुलांना घरी परत आणण्यासाठी आता पालकांनी शासनदरबारी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे लवकरच संबंधित विद्यार्थी नांदेडला परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इयत्ता १२ वीच्या परीक्षेनंतर वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी शाखेचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे कोचिंग क्लाससाठी दरवर्षी जातात. नांदेड येथील अनेक विद्यार्थी सध्या कोटामध्ये अडकले आहेत. याशिवाय हैदराबाद येथे नारायणा इन्स्टिट्युट व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये अभ्यास करण्यासाठी काही विद्यार्थी गेले आहेत. याशिवाय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणारे अनेक विद्यार्थी राज्यातील पुणे शहरात वास्तव्य करून आहेत. परंतु, इकडे त्यांचा पालकवर्ग चिंतेत पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीला एक महिना पूर्ण झाला आहे. या काळात सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांशी प्रत्यक्ष भेटता आले नाही. केवळ मोबाईल फोन व व्हिडिओ कॉलद्वारे ते पालकांच्या संपर्कात आहेत. कोटा, हैदराबाद, पुणे येथे वास्तव्य करून असलेल्या विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था आहे. तसेच खर्चासाठी ऑनलाईन बँकींगद्वारे पालकांना पैसेही पाठवता येतात. परंतु, तेथे राहून करायचे काय, फक्त अभ्यास करण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय या विद्यार्थ्यांसमोर नाही. संचारबंदीमुळे सर्व कोचिंग क्लासेस, इन्स्टिट्युट बंद आहेत. काही ठिकाणी मेस बंद असल्यामुळे देखील विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होत आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना आता घरी येण्याची ओढ लागली आहे. संचारबंदीचा कालावधी आणखी वाढला, तर करायचे काय, असा प्रश्न या सर्व विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकवर्ग चिंतेत सापडला आहे. आमच्या पाल्यांना घरी येण्याची परवानगी द्यावी, यासाठी पालकांनी पालक मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आग्रह धरला आहे. त्यानुसार पालकमंत्री चव्हाण यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना याबाबत पत्र लिहिल्याचे समजते. लवकरच हे सर्व विद्यार्थी आपल्या घरी येऊ शकतील, अशी अपेक्षा धिरज तोष्णीवाल तसेच मनोहर आयनेले यांच्यासह अन्य पालकांनी व्यक्त केली आहे.