नांदेड - नांदेडमध्ये अडकलेल्या पंजाबच्या यात्रेकरूंनी आपला गाव गाठला. मात्र, पंजाब सरकारच्या आरोग्य यंत्रणेने त्यांची जागेवरच कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केली. आज सकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात या यात्रेकरूंपैकी १४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातच यांना सोडून आलेल्या आतापर्यंत चार चालकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंजाब सरकारकडून हा नांदेडमध्ये कोरोनाची लागण झाल्याचा आरोप होत आहे तर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. ही लागण नांदेडमधून झाली की? रस्त्यात प्रवासादरम्यान झाली याबाबत नांदेडकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नांदेड की पंजाब हा वाद राजकीय असला तरी सध्या मात्र नांदेडकरामध्ये भीतीचे सावट आहे. प्रशासकीय पातळीवरही सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पारंपरिक हल्ला महल्लासाठी नांदेडमध्ये गेल्या चाळीस दिवसांपासून मुक्कामाला असलेल्या जवळपस साडेचार हजार यात्रेकरूंना सोडविण्यासाठी पंजाब प्रशासन प्रयत्न करत होते. त्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी जिल्हा प्रशासन व पंजाब सरकार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर केंद्राने त्यास परवानगी दिली होती.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात खुराणा ट्रॅव्हल्सने आणि मिनी ट्रॅव्हल्सने तेरा गाड्यांमधून 1 हजार 700 यात्रेकरु निघाले होते. रात्री हे यात्रेकरू तेथे पोहोचल्यानंतर पंजाब सरकारने काळजी घेतली आणि या सर्वांचे स्वॅब तपासण्याची मोहीम सुरू केली. शुक्रवारी (दि. 1 मे) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 148 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत तीन हजार यात्रेकरू नांदेड येथून पंजाबमध्ये पोहोचले आहेत. विशेष म्हणजे पंजाबमधील एकूण कोरोनाग्रस्त 542 रुग्णांपैकी 148 रुग्ण नांदेडवरून परतलेले यात्रेकरू आहेत. पंजाब सरकारच्या आरोग्य मंत्र्यानीही नांदेडमुळेच पंजाबमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील पंजाब सरकारच्या गाड्यांमध्ये गेलेल्या जवळपास 2 हजार यात्रेकरूंना याच पध्दतीने तपासण्यात येणार आहे. ते आज पंजाबमध्ये पोहोचतील. त्याठिकाणी त्यांच्या निवासस्थानाची माहिती घेवून त्यांचे स्वॅब तपासण्यात येणार आहेत.
नांदेडमध्ये पंजाबहून आलेल्या चार चालकांना कोरोनाची लागण..!
सुरुवातीला अबचल नगर भागातील पंजाबहुन नांदेडला परतलेल्या चालकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर खुराणा ट्रॅव्हल्सने गेलेल्या यात्रेकरुंना सोडून या गाड्या नांदेडमध्ये गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रात्री उशिरा पोहोचल्या. त्यातील 30 चालकांना प्रशासनाने सीमेबाहेरच रोखून त्यांना विशेष वाहनाने आयुर्वेदिक महाविद्यालयात आणण्यात आले आहे. त्यातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नांदेडमधील प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून यात्रेकरूंच्या सेवेत असलेल्या सर्व मंडळींची वैद्यकीय तपासणी सुरु असून, जवळपास अडीचशे जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्राथमिक तपासणीत त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, खबरदारीचा भाग म्हणून या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नांदेडमध्ये आतापर्यंत पंजाबहुन परतलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुरुद्वारा परिसर सील
नांदेडमध्ये पंजाबमधून आलेल्या चालकाला कोरोनाची लागण झाली. तो गुरुद्वारा परिसरातील अबचल नगर भागातील होता. पंजाब येथून येऊन कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेकांनी शंका उपस्थित केली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या. गुरुद्वारा परिसर व अबचलनगर परिसरातील भाग सील करण्यात आला आहे. त्या परिसरातील थर्मल मशीनद्वारे तपासणी सुरू आहे. अगोदरच ग्रीन झोन मधील नांदेड ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही साखळी वाढून जिल्हा रेड झोनमध्ये जाऊ नये, यासाठी नांदेडकरातून प्रार्थना केली जात आहे.
नांदेडमध्ये यात्रेकरूंना कोरोनाची लागण नाही - संत बाबा बलविंदरसिंगजी
लॉकडाऊनमुळे नांदेडमध्ये अडकलेल्या पंजाबमधील सर्व भाविकांची श्री लंगर साहिब येथे सर्व व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे दीड महिना हे भाविक नांदेडमध्ये होते. या कालावधीत त्यांची नियमित आरोग्य तपासणीही करण्यात येत होती. या भाविकांना येथील शेकडो सेवेकरांनी सेवा दिलेली आहे. नांदेडमध्ये गुरुवारपर्यंत (दि. 30 एप्रिल) तब्बल ९८५ जणांच्या स्वॅबची तपासणीही झाली आहे. मात्र, एकही सेवेकरी कोरोनाबाधित आढळलेला नाही. त्यामुळे यात्रेकरूंना नांदेडमध्ये कोरोनाची लागण झाली असे म्हणणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी दिली आहे.
कोणी दुबईहून तर कोणी चीनमधून आले आहे त्यास कोणास जबाबदार धरावे - अशोक चव्हाण
नांदेडमधून पंजाबला परत गेलेल्या भाविकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे पंजाब सरकारचे आरोप आहे. त्यामुळे नांदेडच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. याबाबत बोलताना पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, की देशामध्ये कोणी चीनवरुन तर कोणी दुबईवरून आले आहेत. त्यासाठी कोणाला जबाबदार धरावे?, असा प्रतिसवाल करीत चव्हाण यांनी यात कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला दिला आहे.
नांदेडच्या हुजूर साहिब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी पंजाब व हरियाणा येथून आलेले सुमारे साडेतीन हजार भाविक नांदेडमध्ये अडकले होते. राज्य सरकार पंजाब सरकार व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीने या साडेतीन हजार भाविकांना पंजाबमध्ये पोहोचविले गेले होते. नांदेडहून पंजाबला गेलेल्या जवळपास १००च्या वर भाविकांना कोरोनाची लागण लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे नांदेडच्या कार्यपद्धतीवर काही जण टीका करत आहेत. मात्र, हा राजकारण करण्याचा विषय नाही. आरोप प्रत्यारोपांच्या विषय असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नांदेडमध्ये सध्या तरी कोरोना नियंत्रणात आहे. स्थानिक संशयित लोकांची चाचणी केली जात आहे. मात्र, या स्थानिकांचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
यात्रेकरूंशी संपर्क आलेल्या सर्वांची तपासणी आवश्यक?
नांदेडमध्ये हल्ला-महल्लाच्या निमित्ताने आलेले हे पंजाब व हरियाणा राज्यातील हे यात्री 40 दिवस नांदेडमध्ये होते. दुर्दैवाने ते नांदेडमध्ये या यात्रेकरूंना लागण झालेली असेल तर त्यादृष्टीने काळजी व उपाययोजनाही तितकीच आहे. ज्या ठिकाणी ते राहिले, त्यांचा कुणा-कुणाशी संपर्क आला, गुरुद्वारामध्ये सेवा दिली का? अनेक नेतेमंडळी, अधिकारी, कर्मचारी यांचीही तपासणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच यात्रेकरू ज्या ठिकाणी राहिले व वावरले तो ही परिसर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
हेही वाचा - कोरोनावर कोणीही राजकारण करू नये... अशोक चव्हाणांचा टिकाकारांना सल्ला