नांदेड - महापौर पदासाठी बुधवारी संपूर्ण राज्यात सोडत काढण्यात आली. यावेळी नांदेडचे महापौर पद ओबीसी महिलेकरिता राखीव झाले आहे. १ मे २०२० पूर्वी ओबीसी महिलेकडे नांदेडच्या महापौर पदाची सूत्रे जाणार आहेत. यासाठी काँग्रेसकडे अकरा उमेदवार पात्र असून यातीलच काही चेहरे स्पर्धेत राहण्याची शक्यता आहे. सोडतीनंतर लगेचच काही उत्साही उमेदवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे अशोक चव्हाण ठरवतील त्याची महापौर पदासाठी वर्णी लागू शकते. नांदेडच्या महानगरपालिकेत ८१ नगरसेवक असून त्यापैकी ७३ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. तर भाजपचे सहा, शिवसेना व अपक्षला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. अपक्ष नगरसेवकानेही काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ ७४ आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण
३० एप्रिल २०२० ला महापौर पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असून त्यापूर्वीच नवीन महापौर नियुक्त करावा लागेल. सध्याचे महापौर पद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे मागचे अडीच आणि आगामी पाच वर्षांच्या काळात नांदेड महानगरपालिकेत महिलाराजच राहणार आहे.
हेही वाचा - 'कोणाला किती अन् कोणती माहिती द्यायची, हे मुख्य न्यायाधीशांचे कार्यालय ठरवेल'
नवीन महापौर पदासाठी शिवाजीनगरच्या मोहिनी विजय येवनकर, भाग्यनगरच्या जयश्री निलेश पावडे, तरोड्याच्या सुनंदा पाटील, संगिता तुपेकर, कौशल्या पूरी, देगलूरनाका भागातील रेहाना बेगम चाँदपाशा कुरेशी, असिया बेगम मो.-हबीब, सिडकोच्या मंगला देशमुख, शोभानगरच्या माजी महापौर शैलजा स्वामी, वजिराबादच्या प्रभादेवी यादव, दत्तनगरच्या अलका शहाणे या अकरा महिला नगरसेवक पात्र आहेत. महापौरपदी यातील कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.