नांदेड: मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका युवकाने स्वतःचे जीवन संपविले. ही घटना हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे रविवारी मध्यरात्री घडली. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरू केले होते. मात्र सरकारने हस्तक्षेप करताच जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढली.
जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये उपोषणाला बसले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कामारी गावातील मराठा समाजातील काही बांधव आरक्षणासाठी गेल्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आपल्या सर्वांना आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली
पालकमंत्र्याची घटनास्थळी भेट: नांदेड जिल्ह्यातील कामारी गावात उपोषणाला बसलेल्या सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये कामरीकर या तरुणाने काल रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृत्यू झालेल्या युवकाच्या खिश्यात पोलिसांना सुसाईड नोट मिळून आली अशी माहिती समोर येत आहे. पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यावरच मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला. कामारी या गावामध्ये असंख्य मराठा बांधव उपस्थित झाले आहेत. आणखीन मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिसरातील युवक जमा होत आहेत.
अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया: कामारी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथील सुदर्शन देवराये तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण म्हणाले, देवराये कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. शासनाने या घटनेची तातडीने दखल घ्यावी. मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यासाठी राजकीय व कायदेशीर पातळीवर लढा द्यावा लागणार आहे. मात्र, समाजातील सर्व तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे की, कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका. हा प्रश्न आयुष्य संपवून नव्हे तर शासनावर लोकमताचा दबाव निर्माण करूनच सुटणार आहे, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.
मराठा आरक्षण: आजतगायत जवळपास ५० बळी या केवळ एका मुद्द्यावर गेले आहेत. अंतरवाली सराटीच्या आंदोलनानंतर मागील १५ दिवसातला हा दुसरा बळी शासनाने आज घेतला आहे. असे किती बळी घेतल्यावर मराठा समाजाच्या पदरात सरकार आरक्षण टाकणार आहे, हे शासनाने एकदाचं स्पष्ट करावं. अन्यथा कायद्याच्या चौकटीत टिकणारं ओबीसीतून आरक्षण देऊन तात्काळ मराठा समाजाचा हा ज्वलंत प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक श्याम पाटील वडजे यांनी केली आहे.
हेही वाचा: