नांदेड - संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकरी सर्व सामान्य व्यक्तींना पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत याबरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेतला आहे. यानुसार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये “पौष्टिक तृण धान्य दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
कृषि विभागामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम - या दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील गावांमध्ये कृषि विभागामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा पिका पासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ, आहारासाठी पौष्टीक असल्याने यांची माहिती देण्यात येणार आहेत. 14 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती-भोगी हा दिवस जिल्ह्यात “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे.
क्षेत्र वाढीवर भर दिला जाणार - आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. त्याची सुरवाता जानेवारी महिन्यापासून होत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सुचनेनुसार आहारात तृणधान्याचे महत्व समजावे, यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तृणधान्यापासून महिलांच्या पाककृती स्पर्धा घेतल्या जणार आहेत. यामाध्यमातून प्रामुख्याने बाजरी, भगर, ज्वारी क्षेत्र वाढीवर भर दिला जाणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी सांगितले.