माहूर (नांदेड) Mahur Navratri festival 2023 : नवरात्र उत्सव काळात रेणुका मंदिराच्या पायऱ्यावर दिवे, कापूर लावण्यास बंदी (Ban on lighting lamps and Kapoor on steps) घालण्यात आली आहे. माहूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी पाच वाजता श्री रेणुका देवी नवरात्र उत्सव आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. श्री रेणुका देवी संस्थानचे सचिव तथा जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तर संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव, संस्थानचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद शिनगारे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तालुका आरोग्य अधिकारी आर. डी. माचेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम राठोड उपस्थित होते.
भाविकांसाठी असणार 'ही' सुविधा: सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी श्री रेणुका देवी संस्थान, नगरपंचायत, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग यांच्याकडून नवरात्र उत्सवाकरिता करण्यात आलेल्या तयारीचा विभागवार आढावा घेतला व आवश्यक असलेल्या सूचना दिल्या. श्री रेणुका देवी संस्थानने भाविकांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था, भाविकांना मुखदर्शनाकरिता मोठ्या एलसीडीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नऊ दिवस महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे अशी माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कानव, व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली.
सुरक्षेकरिता मोठा पोलीस बंदोबस्त: नगरपंचायत कार्यालयाने वाहनतळ, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छते करिता अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर नऊ दिवस 24 तासांकरिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड यांनी दिली आहे. नवरात्र उत्सवा करिता राज्य परिवहन महामंडळ शंभर बसेस उपलब्ध करून देणार आहेत. सुरक्षेकरिता मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर भाविकांना दर्शनाकरिता मंदिर सकाळी पाच ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत दर्शनाकरता खुले राहणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता वेळ वाढवून देण्यात येणार आहे. भाविकांनी संस्थानच्या अधिकृत बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने देणगी जमा करावी असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांनी केले आहे.
बैठकीला 'या' मान्यवरांची उपस्थिती: आढावा बैठकीस विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कांनव, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, शाखा अभियंता आकाश राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार, ग्रामीण रुग्णालयाचे शिवाजी साळुंखे, नगरपंचायतचे अधीक्षक वैजनाथ स्वामी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, राज्य परिवहन महामंडळाचे चंद्रशेखर समर्थवाड यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख प्रतिनिधी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे संचालन व आभार नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी मानले. श्री रेणुकादेवी नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, व्यासपीठावर तहसीलदार किशोर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद शिनगारे उपस्थित होते.
हेही वाचा: