नांदेड - जिल्हा परिषदेच्या निवणुकीमध्ये अध्यक्षपदी काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी निवडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर, भाजपला मात्र जादुई आकड्यापर्यंत जाणे शक्य नसल्याने काहीच हालचाल करता आली नाही.
नांदेड जिल्हा परिषदेतील एकूण ६३ सदस्य संख्या असून काँग्रेसकडे सर्वाधिक २८ सदस्य आहेत. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येक ६ सदस्य असून रासपच्या एका सदस्यासह एका अपक्ष सदस्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने आघाडीचे संख्याबळ ४३ एवढे झाले होते.
अध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार हे स्पष्ट होते. या पदासाठी मंगाराणी अंबुलगेकर (बाराळी), विजयश्री कमठेवाड (बरबडा), शकुंतला कोमलवाड (यवती) आणि सविता वारकड (बारड) या चौघी दावेदार होत्या. अखेर पक्ष श्रेष्ठींनी अंबुलगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तर, उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनाही आग्रही होती. त्यामुळे उपाध्यक्षपदावर मतैक्य घडविण्यासाठी सोमवारी रात्री उशीरापर्यंत तीन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. मात्र, रात्री उशिरापर्यंत एकमत न झाल्याने मंगळवारी सकाळी काँग्रेसकडून संजय बेळगे, शिवसेनेकडून बबन बारसे आणि पद्मा नरसारेड्डी सतपलवार, राष्ट्रवादीकडून संगीता मॅकलवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती. या वेळेत महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे निश्चित करित या पदाकरिता पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांची निवड झाली. त्यानुसार उपाध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या इतरांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे सतपलवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. निवडीनंतर काँग्रेससह शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांचे आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
हेही वाचा - नांदेड जिल्हा परिषद : मंगळवारी होणार अध्यक्षसह उपाध्यक्षपदाची निवडणूक
नांदेड जिल्ह्यात नेहमीच विरोधकांवर मात करण्यात ना. अशोक चव्हाण यशस्वी ठरले आहेत. यावेळी भाजपचे १४ तर राष्ट्रवादीतुन भाजपत प्रवेश केलेले बापूसाहेब गोरठेकर गटाचे ४ सदस्य आहेत. तसेच शिवसेनेतही खा. प्रताप पाटील चिखलीकर गटाचे सदस्य होते पण, सत्तेपर्यंत जाण्याचा आकडा मात्र जुळणारा नव्हता. त्यामुळे सदरील गट मात्र तटस्थच राहावे लागले. त्यामुळे ना.अशोक चव्हाण यांचा जिल्हा परिषदेचा सत्तेचा मार्ग कोणीही रोखणारा नव्हता. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या काही सदस्यांचा रुसवा दिसला. परंतु, तो राग मात्र जास्त वेळ टिकू शकला नाही. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा असाच यशस्वी प्रयोग झाल्यास भाजपला मात्र चांगलीच कोंडीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - नांदेड : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन