नांदेड - धर्माबाद शहरातील किराणा दुकान गोदाममधून वाहनात, गुटखा व तंबाखू मिश्रीत माल भरत असताना पोलिसांनी रविकुमार शंकरराव कोंडावार, राजकुमार शंकरराव कोंडावार या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई संचारबंदीत पोलीस पेट्रोलींग करताना करण्यात आली.
धर्माबाद शहरात बेकायदेशीर गुटखा विक्री केली जात आहे. संचारबंदी लागू असतानाही गुटखे बहादूर विक्रेत्यांना, जीवनावश्यक वस्तूंपेक्षा गुटखा महत्वाचा वाटु लागला आहे. चढ्या भावाने विक्री करून आपली पोळी भाजून घेण्यासाठी गुटखा खाणाऱ्याची लूट केली जात आहे. अशातच धर्माबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे हे सकाळी गस्त घालत होते. दरम्यान, राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावर तत्काळ उजगरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन महिंद्रा पिकअप (एमएच 26 एच 4104) ही गाडी अडवून तपासणी केली. यावेळी गाडीत गुटखा व तंबाखू मिश्रीत माल आढळून आला. त्यात सखोल चौकशी केली असता गोदामातून अंदाजे लाखभर किंमत असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. त्यात रजनीगंधा, बाबा जर्दा, मिराज, राजनिवास, जाफरानी जर्दा आदी गुटखा व तंबाखूजन्य वस्तू असा अंदाजे लाखो रुपयांचा माल मिळाला.
सदरील गुटखा हा रविकुमार शंकरराव कोंडावार, राजकुमार शंकरराव कोंडावार यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलीस अन्न व औषध सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे.