नांदेड - भोकर तालुक्यातील कोळगाव बु. गावाने पाणी फाउंडेशन आयोजित वाटरकप स्पर्धा जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे गावाला पाणीदार करण्यासाठी सर्व ग्रामस्थ श्रमदानासाठी एकवटले आहेत. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी गुरुवारी या गावाला भेट देऊन कामाची पाहणी केली.
कोळगाव बु. हे २ हजार मानवी वस्तीचे डोंगर दऱयात वसलेले गाव आहे. या गावाच्या जवळच सुधा प्रकल्प आणि सुधा नदी असतानाही कायम पाण्याचे दुर्भिक्ष असते. येथील अधिकतर शेती गायरान असून सिंचनक्षेत्र मर्यादित आहे. त्यामुळे पावसाळा या एकाच हंगामावर शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. मात्र, पावसाचा लहरीपणा आणि सततची नापिकी यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यावर मात करण्याचा निश्चय करून तालुक्यात सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
स्पर्धेच्या नियमानुसार ८ एप्रिल पासून सुरू झालेल्या स्पर्धेदरम्यान श्रमदानातून करायची विविध जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यात आतापर्यंत दगडी कंटुर बांध १२०० रनिंग मीटर, ग्याबीयन १०, एलबीएस १८, मालग्रेडर कंटुर बल्डींग २५० रनिंग मीटर, कंपार्टमेंट बल्डींग ५ हेक्टर ही कामे केली आहेत. याच बरोबर श्रमदान आणि यंत्राच्या सहाय्याने ६ वनतळे, ३ शेततळे, २ मातीनाला, १ सिमेंट नाला, ५० कंपार्टमेंट बल्डींग यासारखी कामे झाली आहेत. यास ग्रामस्थांना जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाची साथ मिळत असल्याने गाव पाणीदार होणारच, असा विश्वास निर्माण होऊन स्पर्धा सुध्दा जिंकणार यासाठी रात्रंदिवस ग्रामस्थ कामाला लागले आहेत.
पाण्यासाठी ग्रामस्थांनी केलेली एकजुट पाहून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. त्यामुळेच त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रशासन, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधीसुद्धा श्रमदान करण्यासाठी गावाला भेटी देत आहेत.