कोल्हापूर : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते पायाला भिंगरी बांधून राज्यभर फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र, विमानातील तांत्रिक बिघाडामुळं खासदार राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला. कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण व सर्व नियोजित कार्यक्रम शनिवारी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार : राज्यात विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्यानं आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय. महिनाभरापूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगलीचा दौरा केला आणि आता ते कोल्हापुरात येऊन विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द झाल्यामुळं शनिवारी (5 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजता शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण होणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दोन दिवसीय दौऱ्यामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कार्यक्रमस्थळी आणि विमानतळ परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात सुमारे दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
राहुल गांधींच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन : राहुल गांधी शनिवारी कोल्हापुरातील सयाजी हॉटेल येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला गांधी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाला देशभरातून 1 हजार विशेष प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा
- 'लाडक्या बहिणीं'साठी इतर योजनांचा निधी वळवला! योजनांवर नेमका किती खर्च? - ladki bahin yojana
- ऐतिहासिक वास्तूंच्या नुकसानीनंतर 2 वर्षांचा तुरुंगवास; मंत्रिमंडळाने घेतले 41 निर्णय - State Cabinet Meeting Decision
- 2029 ची निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार; शाहांच्या विधानानंतर महायुतीत कलगीतुरा - assembly election 2024