नांदेड - कृषी क्षेत्राला चालना मिळावी यासाठी नांदेड रेल्वे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे सतत प्रयत्न करत असतात. यातच 5 जानेवारी रोजी नांदेड विभागातून प्रथमच नगरसोल येथून पहिली किसान रेल्वे सुरु करण्यात आली. त्यानंतर 9 महिन्यांतच नांदेड रेल्वे विभागाने नगरसोल येथून 337 किसान रेल्वेद्वारे देशभर विविध ठिकाणी 1 लाख टनाहून अधिक कृषी मालाची वाहतूक केली आहे. यामुळे या क्षेत्रातील कृषी क्षेत्राला चालना मिळाली आहे.
337 किसान रेल्वे
नगरसोल येथून 337 किसान रेल्वेद्वारे कांदा, टरबूज, टोमॅटो आणि द्राक्षे असा 1 लाख टन माल न्यू गुवाहाटी, मालडा टाऊन, न्यू जलपैगुरी, अगरतला, गौर, मालडा, दानकुनी, चितपूर, संक्रेल इत्यादी ठिकाणी पोहोचविण्यात आला आहे.
५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात
कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवेला प्राधान्य देण्यात आले. कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण ५० किलोमीटर प्रतीतास या वेगाने धावतात. यामुळे शेतीचा माल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजार पेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने "ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल" च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० % वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी ५० % दर सवलत देण्यात आली आहे. यासंधीचा लाभ घेत या परिसरातील शेतकरी आणि शेतीमाल व्यापाऱ्यांनी एकट्या नगरसोल रेल्वे स्थानकावरूनच 1 लाख टन कृषी मालाची वाहतूक केली.
शेतीमालाला चांगला भाव
किसान रेल्वे मध्ये सामान्यतः 10-12 पार्सल वेन असतात. प्रत्येक पार्सल वेनची मालवाहन क्षमता 23 टन एवढी असते. यामुळे लहान शेतकऱ्यांना व शेतीमाल व्यापाऱ्यांना त्यांचा माल किसान रेल्वेने पाठविणे सोयीचे आणि फायद्याचे झाले. त्यांने देशातील छोट्या-मोठ्या शहरात व्यापार करणे सुलभ झाले. आपल्या मालाची मार्केटिंग करून तो विकणे सोपे गेले. निश्चित वेळेत माल पोहोचविणे शक्य झाल्यामुळे शेतीमालाला चांगला भाव मिळाला. यामुळे रेल्वे तसेच शेतकरी आणि शेती व्यापारी दोघांचाही फायदा झाला.
हेही वाचा - आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत महाघोटाळा - प्रवीण दरेकर