नांदेड - जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने अनेक संकटानंतर खरीप पेरणी झाली. जिल्ह्यातील खरीप पेरणी संपली असून, शिवारात हिरवीगार पिके डोलताना दिसून येत आहे. तर शेतकरी पिकांतील तण काढण्यात व्यस्त असून आंतरमशागतीत गुंतला आहे.
कुठे कमी तर कुठे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अनेक भागात दुबार पेरणी करावी लागल्याचे चित्र पहायला मिळाले. मोठ्या संकटातून व कष्टातून शेतकऱ्यांनी खरीप हंगाम फुलवला आहे. यंदा खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात ७ लाख ४२ हजार ७८१ हेक्टरवर पेरणी झाली असून, जवळपास सर्व पेरणी आटोपली आहे. यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यानंतर कपाशीला प्राधान्य दिले आहे.
सोयाबीन, तूर, भात, मका या पिकांच्या पेरणीक्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. सात तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक, एका तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राएवढी तर आठ तालुक्यांत सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी पेरणी झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
खरीप हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४२ हजार ८६१ हेक्टर प्रस्तावित आहे. त्यात सोयाबीनचे ३ लाख ९ हजार ३७५ हेक्टर, कपाशी २ लाख ६० हजार ५०५ हेक्टर, तूर ६० हजार ७८८ हेक्टर , मूग २६ हजार ८ ९ ३ हेक्टर , उडीद २८ हजार ६०८ हेक्टर, ज्वारी ५३ हजार २५० हेक्टर, बाजरी ३३ हेक्टर , मका ६४ ९ हेक्टर, भात ८५८ हेक्टर, तीळ ७ ९९ हेक्टर, कारळ ४७१ हेक्टर, सूर्यफूल ९६ हेक्टर, खरीप भुईमूग ३३ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र
ज्वारी २९ हजार ४२९ हेक्टर (५५.२७ टक्के), बाजरी २१ हेक्टर (६३.६४ टक्के), मका ६८० हेक्टर (१०४.७८ टक्के), भात ९२० हेक्टर ( १०७.२३ टक्के ), तूर ७२ हजार ८६ हेक्टर (११८.५९ टक्के ), मूग २५ हजार १९५ हेक्टर ( ९ ३.६१ टक्के ), उडीद २६ हजार २९५ ( ९१.९१ टक्के ), सोयाबीन ३ लाख ७३ हजार ४७५ हेक्टर (१२०.७२ टक्के ), तीळ ४२ ९ हेक्टर (५३.६९ टक्के ), कारळ २६२ हेक्टर (५५.६३ टक्के) समावेश आहे. कपाशीची २ लाख १३ हजार ९ १५ हेक्टर (८२.१२ टक्के) लागवड झाली आहे. तृणधान्याची एकूण ३१ हजार ५० हेक्टरवर (५६.४१ टक्के) , कडधान्यांची १ लाख २३ हजार ५७६ हेक्टर (१०६.१२ टक्के), गळीत धान्यांची ३ लाख ७४ हजार २४० हेक्टरवर (१२.३९ टक्के) पेरणी झाली आहे.
अर्धापूर, मुदखेड, धर्माबाद, देगलूर, बिलोली, कंधार, लोहा या सात तालुक्यांत सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त हिमायतनगर तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राएवढी पेरणी झाली आहे. अन्य आठ तालुक्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी पेरणी झाली आहे.