नांदेड - शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. दिलीप ठाकूर यांचे विविध सामाजिक उपक्रम सुरूच असतात. नुकताच त्यांनी रस्त्यावर फिरणारे बेघर, भटके, मतिमंदाच्या आरोग्याची काळजी घेत शरीराची स्वछता राहावी यासाठी त्यांची दाढी कटिंग करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मागील आठवड्यापासून हा उपक्रम सुरू असून पाऊस पडत असताना देखील 'नियोजित कायापालट' या उपक्रमाच्या दुसऱ्या आठवड्यात 21 बेघरांची मोफत दाढी कटिंग करून नवीन कपडे जेवण व रोख रक्कम बक्षिसही देण्यात आले आहे.
आर्थिक अडचणीमुळे किंवा मानसिकरित्या कमकुवतपणामुळे रस्त्यावरील निराधारांना विश्वासात घेऊन त्यांची कटिंग दाढी करण्याचा 'कायापालट' हा उपक्रम पंधरा दिवसापूर्वी दिलीप ठाकूर यांनी सुरू केला. दाढी कटिंग करण्याचा निरोप सर्व बेघरांना आधीच देण्यात आला होता. मध्यरात्रीपासून तुफान पाऊस पडत असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची परिस्थिती असतानाही ॲड. दिलीप ठाकूर यांनी हा उपक्रम सुरू ठेवून सामाजिक कार्याचा वसा जोपासला आहे.
रस्त्यावरील बेघराचा शोध घेत केला कायापालट
ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजपा महानगर नांदेड व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू आहे. शहरातील ज्यांनी स्वच्छतेच्या या उपक्रमासाठी साथ दिली आहे. त्यातील नागनाथ महादापुरे, अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा यांनी भर पावसात सर्व रस्ते फिरून योग्य व्यक्तीची निवड केली. बजरंग वाघमारे यांनी 21 बेघरांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या सहकार्याने सर्वांच्या आंघोळीची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर त्यांना नवीन कपडे परिधान करण्यासाठी देण्यात आले. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे असे बेघर व्यक्ती आढळल्यास त्यांना या उपक्रमाची माहिती द्यावी, असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
हेही वाचा -७७ वर्षीय आजोबांचा ३ महिन्यात दुचाकीवर १९ हजार किलोमीटर प्रवास, घेतले शक्तीपिठांचे दर्शन