नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या अनुषंगाने कामेही वाढत आहेत. त्यामुळे, सोमवार म्हणजेच आजपासून नांदेड महापालिकेतील सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. जे कर्मचारी यापुढे हजर राहाणार नाही, त्यांची अनुपस्थिती नोंदवण्याचे आदेश आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिले आहेत.
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासन आदेशानुसार महापालिकेतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयांमध्ये पाच टक्के कर्मचारी काम करत होते. त्यानंतर दहा टक्के कर्मचारी काम करत होते. पण आता नांदेड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या अनुषंगाने कामेसुद्धा वाढत असल्याने आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून त्याबाबतचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहेत.
सोमवारपासून सर्वांना कामावर येणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडण्याची परवानगी घेतलेली आहे, असे आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी हे आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ शकतात. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता परावर्तीत रजासुद्धा शासन निर्णयातील तरतुदीनुसार मंजूर करण्यास हरकत नाही. ज्यांना रजा हवी असेल त्यांना मिळेल, मात्र रजा मंजूर झाल्याशिवाय गैरहजर राहू नये, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.