नांदेड - जिल्ह्यातील कारवाडी (ता.अर्धापूर) येथील शिवराज पोटले यांच्या हळदीच्या शेतात पुन्हा बिबट्याने सहा महिन्याच्या म्हशीच्या पिलाला (वघारी) फस्त केल्याची घटना गुरुवारी ४ फेब्रुवारीला रात्री घडली. अनेक शेतकऱ्यांच्या नजरेस हा प्रकार पडला असून अर्धापुर तालुक्यात भीतीचे सावट कायम आहे.
एका बिबट्याला पकडून जंगलात सोडले -
अर्धापूर तालुक्यातील पांगरी शिवारात एक बिबट्या विहिरीत पडल्यानंतर त्याला वनविभागाने पकडून जंगलात सोडून दिले. मात्र, त्याचाच दुसरा साथीदार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुरुवारी शिवराज पोटले यांच्या शेतात सहा महिन्याच्या म्हशीच्या पिलाला (वघारीला) १ फस्त केले आहे.
यापूर्वीही एका जनावराला केले होते फस्त -
अर्धापूर तालुक्यात बिबट्याचा मुक्तसंचार सुरूच असून अनेक शेतकऱ्याच्या नजरेस दिसून आला. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात काही दिवसांच्या अंतराने पुन्हा बिबट्याचा वावर असल्याच्या माहितीमुळे शेतकरी चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने एक जनावर फस्त केले. या परिसरात बिबट्याचा संचार सुरू आहे.
वनविभागाची गस्त नावालाच -
गेल्या आठवड्यात अर्धापूर तालुक्यातील रोडगी शिवारातील अनिल कदम यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला जिवंत बाहेर काढण्याची घटना झाली होती. काही दिवसांतच खैरगाव शिवारात एक जनावर फस्त केले होते. अर्धापूर तालुक्यातील चोरंबा, निमगाव, चाभरा, सायाळवाडी, देशमुखवाडी आदी भाग जंगल असून या भागात वनविभाग कर्मचारी कार्यरत आहे. या परिसरात घडलेल्या घटनेने वनविभाग सतर्क झाला असला तरी या परिसरात वनविभागाने गस्त मात्र नावालाच आहे.
बागायती क्षेत्र आणि रात्रीची लाईट -
अर्धापुर तालुक्यात बागायती क्षेत्र असून पिकांना पाणी देण्यासाठी नेहमीच शेतात राहावे लागते. त्यात रात्रीची लाईट यामुळे अजूनच अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. शेतकरी आणि गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, असे आवाहन वन विभागाच्यावतीने केले असले तरी शेतकऱ्यांना मात्र जीव मुठीत धरूनच याला तोंड देत आहेत. तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.