नांदेड - अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी मुदखेड तालुका प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. वासरी गावालगत नदीपात्रात सापडलेल्या तीन बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. तहसीलदार दिनेश झापले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मुदखेड तालुक्यातील वासरी, शंखतीर्थ, महाटी, टाकळी या ठिकाणी गोदावरी नदीच्या तीरावर अवैधरित्या चोरट्या पद्धतीने वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी गेल्या 5 दिवस येत होत्या. अखेर तहसीलदार दिनेश झापले यांनी रविवारी याबाबत धाडसी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार संजय नागमवाड, मंडळ अधिकारी लाठकर, पोलीस हेडकॉन्टेबल शिंदे आणि 4 तलाठी यांच्या पथकाने गोदावरी नदीच्या काठी आणि पात्रामध्ये वाळूचा उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेतला. त्यावेळी या पथकाला बासरी गावालगत नदी पात्रात तीन बोटी सापडल्या. यानंतर या सर्व बोटी जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - दाट धुके अन् ढगाळ वातावरणाने हरभऱ्याचे नुकसान... शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर!
मुदखेड तालुक्यातील वासरी आणि आजूबाजूला गोदावरी नदीच्या तीरावर मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्याचा वाळू माफियांचा इरादा होता. तसेच रविवारी सुट्टीचा गैरफायदा घेण्याची त्यांची योजना होती. मात्र, तहसीलदारांच्या पथकाने 3 बोटी नष्ट केल्यामुळे वाळू माफियांना सुट्टीचा दिवस महागात पडला असल्याचे बोलले जात आहे.