नांदेड : गेल्या एक महिन्यापासून धर्माबाद तालुक्यात अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. शासनाचे टेंडर सुटलेले नसतानाही, वाळू माफीये महसूल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना हाताशी धरून चोरीने गोदावरी पात्रातून हजारो ब्रास वाळू उपसा करीत असल्याची चर्चा सध्या धर्माबाद तालुक्यात जोर धरत आहे.
धर्माबाद तालुक्यातील आलूर, संगम, व बिलोली तालुक्यातील नागणी या भागातील गोदावरीच्या पात्रातून रोज चोरीने हजारो ब्रास रेती उपसा करून आलूर, संगम, नागणी या गावाच्या परिसरात वाळूचा साठा करून ठेऊन सदरील वाळू मध्यरात्रीच्या सुमारास टिप्पर व ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहतूक करीत आहेत.
साठा करून ठेवलेल्या वाळुची महसूल विभागाला माहिती असूनही यावर काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने होणारा वाळू उपसा हा महसूल विभागाच्या सहमतीने होत आहे की काय, याबाबत सध्या धर्माबाद तालुक्यात उलट सुलट चर्चा होत आहे.
रोज रात्री १२ ते सकाळी 6 वाजेपर्यंत अवैध साठा करून ठेवलेली वाळू टिप्पर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने शहरात नेली जात असून यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.