नांदेड - महाराष्ट्रात तीन पक्षांचे आणि तीन विचारांचे सरकार चालणार कसे ? असा सवाल करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीला विरोध केला होता. मात्र, आम्ही सोनिया गांधी यांना आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजी केले, असा गौप्यस्फोट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केला. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजीत एका कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते.
हेही वाचा.... काँग्रेसने मोदींना पाठवले संविधान; पेमेंट ऑप्शन 'कॅश ऑन डिलीव्हरी'
महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांच्या आग्रहामुळे काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. अशोक चव्हाण यांना या वक्तव्याबाबत त्यानंतर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आता अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार बनण्याबाबत विधान केले आहे.
सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून 'लिहून' घेतले आहे. शिवसेनेने जर उद्देशिकेबाहेर जाऊन काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... तुमचा 'हा' प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल - शरद पवार
राजकारण असो की चित्रपट किंवा नाट्यक्षेत्र, हे तीनही सारखेच आहेत. राज्यात आता सरकारमध्ये असणारे तीन पक्ष एकत्र येतील, असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. हल्ली मल्टीस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजेत. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आले. तीन विचारांच्या पक्षांचे सरकार कसे चालणार, या प्रश्नावर विचार मांडताना अशोक चव्हाण यांनी घटनेच्या आधारावर सरकार चालेल. ही आमची भूमिका आहे, असे म्हटले.
हेही वाचा...पोलिओची चौकशी पडली महागात.. एनआरसीला विरोध करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ठेवले डांबून
संविधानाच्या चौकटीत राहून या सरकारचे काम चालले पाहिजे. जर असे झाले नाही, तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी आम्हाला दिल्या आहेत. याचीही संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.