नांदेड : जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मरडगा येथे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. संजय दत्तराव काळे, असे आरोपी पतीचे नाव असून त्याचा विवाह एक वर्षापूर्वी सगुना उर्फ गायत्री हिच्यासोबत झाला होता. तो त्याच्या पत्नीवर नेहमी संशय घेत असे, या संशयातून पत्नीला केलेल्या मारहाणीत तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोक्याला झाली होती दुखापत
11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 08.00 वाजता गायत्रीच्या सासऱ्याने फोन केला व तुमची भाची सगुणा उर्फ गायत्री ही चक्कर येऊन पडली आहे. आम्ही तिला बाळापूर येथे सरकारी दवाखान्यात आणत आहोत. तुम्ही लवकर या, असा फोन केला. रुग्णालयात गेल्यानंतर मामाने तेथील डॉक्टराकडे विचारपूस केली असता, डॉक्टरांनी गायत्रीच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे, त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे, असे सांगितले. दरम्यान, तीचा पती, सासरा व दीर हे तिथून निघून गेले. त्यानंतर गायत्रीची उत्तरीय तपासणी करून मृतदेह ताब्यात घेऊन हदगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. पती व दिराला याप्रकरणी अटक करण्यात आली असून सासरा, सासू व जाऊ असे तीन आरोपी फरार आहेत.
४ ऑगस्ट २०२० रोजी झाला होता विवाह -
मरडगा येथील संजय दत्तराव काळे यांच्यासोबत सगुना उर्फ गायत्री हिचा विवाह 4 ऑगस्ट 2020 रोजी साध्या पद्धतीने पार पडला होता. हा विवाह सगुणा उर्फ गायत्रीचे मामा रामदास बबनराव अवचार राहणार भोसी यांनी विवाह साध्या पद्धतीने रितीरिवाजात केला होता. तर संजय दत्तराव काळे यांचा या अगोदर एक विवाह झाला होता. त्या विवाहातून त्यांना घटस्फोट सुद्धा मिळाला होता. गायत्री सोबत त्यांचा हा दुसरा विवाह होता. तो गायत्रीवर नेहमीच संशय घेत असे तसेच तुझ्या मामाकडून पैसे घेऊन ये म्हणून वारंवार तगादा लावत असे. हे सर्व प्रकार गायत्रीने तिच्या मामाच्या कानावर घातला. तसेच मी पुन्हा सासरी जाणार नाही, असेही सांगितले. त्यामुळे मामाने विचार करून माझी भाची तुमच्याकडे पाठवणार नाही, असा फोन संजयच्या वडिलांना केला होता. त्यानंतर संजयच्या वडिलांनी आपल्या छोट्या मुलाचा सासरा मधुकर पांडुरंग अवचार यांना मध्यस्ती करण्याचे सांगितले व त्यांच्या मध्यस्थीने राखी पौर्णिमा झाल्यानंतर पाठवणी केली होती.