नांदेड - कोरोनाच्या भयंकर संकटात अनेकांच्या हातचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटापासून देशासाठी वीरमरण आलेल्या जवानांचे कुटुंबीय देखील बचावले नाही. ज्या मातेनं लहानाचं मोठं केलं. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवलं. त्याच मातेवर आता उपसमारीच संकट ओढवलं आहे. त्यामुळं जगाव की, मरावं, असा सवाल या वीरमातेपुढं उभा राहिला आहे.
अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथील जवान शंकर खंडागळे यांना २०१२ मध्ये लेह लडाक येथे शत्रुशी लढताना वीरमरण आलं. मात्र, त्यांच्या पश्चात आई यशोदाबाई यांच्यावर संकट ओढवलं आहे.
एकीकडे कोरोना महामारीनं रोजगार हिरावला तर दुसरीकडं कौटुंबिक कलहामुळं जवान शंकर खंडागळे याच्या पत्नीनं देखील त्यांच्या आईचा सांभाळ करण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत जगावं की मरावं असा, प्रश्न वीरमाता यशोदा यांच्या पुढं उभा ठाकला आहे. वीर जवानाच्या कुटुंबियांची अशा प्रकारे होणारी हाल अपेष्टा रोखण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलणं गरजेचं असून पत्नीप्रमाणे आईसाठीही काही तरी मदत होणं आवश्यक आहे.