नांदेड - पत्नी आणि मुलांना घ्यायला सासुरवाडीला गेलेल्या शेख सद्दाम शेख अहमद यास सासरच्या मंडळींनी मारहाण केली. एवढेच नाही, तर यासंदर्भात हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेले असता, तेथेही पोलिसांकडून त्याला मारहाण करण्यात आली. या रागातून त्याने रविवारी पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला पेटवून घेतले होते. त्यानंतर जखमी सद्दामच्या जबाबावरून हिमायतनगर पोलीस ठाण्यातील फौजदार ज्ञानोबा काळे आणि हवालदार संतोष राणे यांच्यासह सहा जणांवर बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला.
या घटनेत शेख सद्दाम 90 टक्के भाजला असून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या अहवालावरून विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी काळे आणि हवालदार राणे यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.
याप्रकरणी शेख सिराज आणि शेख सरदार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी हिमायतनगर येथील न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.