नांदेड - जिल्ह्यात 1983 नंतरच इतका मोठा पाऊस झाला आहे. नदीकाठची सर्व पिके तर गेलीच त्यासोबतच जमीनही खरडून गेली आहे. जर, शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले हे लक्ष्यात येत असेल, तर पंचनाम्यात वेळ न घालवता सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. ते अर्धापूर तालुक्यात नुकसान भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, जर सरकारमधील मंत्र्यांनाच पीक विमा कंपनीवर विश्वास नसेल, तर शेतकऱ्यांनी कुठे जायचे असा टोला चिखलीकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना यावेळी लगावला आहे. चव्हाण यांनी विमा कंपनीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याला उत्तर देताना चिखलीकर यांनी वरील टिप्पनी केली आहे.
'पंचनामे न करता सरसकट मदत करण्याची मागणी'
जिल्ह्यात पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान, प्रशासन नदीच्या काठावर असलेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. मात्र, अतिवृष्टीने खरिपाच्या पिकांनाही खूप मोठा फटाका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर परिणाम होऊन, शेतकऱ्यांना आर्थिक फटाका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरसकट मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अर्धापुर तालुक्यातील विविध गावांना भेटी
चिखलीकर यांनी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, सांगवी, मेढला, खडकी, कोंढा, सावरगाव, देळुब आदी गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी धर्मराज देशमुख, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, बाबुराव हेंद्रे, निलेश देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, अवधूत कदम, सुधाकर कदम, सखाराम क्षीरसागर, अमोल कपाटे, जठन मुळे, सचिन कल्याणकर, तुळशीराम बंडाळे, नायब तहसिलदार मारोतराव जगताप , तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले, मंडळ अधिकारी संजय खिल्लारे, शेख शफियोदिन, संजय चतरमल, एस.पी.गोखले, विश्वनाथ मुडकर आदी उपस्थित होते.