नांदेड - पंधरा दिवसांच्या कालखंडानंतर शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी सकाळच्या सुमारास नांदेडसह अनेक तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तर अर्धवट रखडलेल्या पेरण्या आता सुरू होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे १५ मिनिटे गारांचा पाऊस झाला आहे. मात्र, या गारांच्या पावसामुळे काहीच नुकसान झाले नसल्याचे समजते आहे.
चार-पाच दिवसापासून उन्हाळयासारखे ऊन पडत होते. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांची वाढ खुंटली होती. पिके पिवळी पडू लागली होती. पावसाची अत्यंत आवश्यकता होती. पावसासाठी अनेक गावात देव-देवतांना अभिषेक करुन भंडारे करण्यात आले. त्यातच शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी सकाळच्या वेळी पावसाने दमदार हजेरी लावली.
काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही केवळ १५ टक्केच पाऊस झाल्याची नोंद शासन दरबारी आहे. अशा परिस्थितीत नदी-नाले अद्यापही कोरडेच आहेत. भविष्यात चांगल्या पावसाची आवश्यकता आहे. पाऊस झाला तरच सर्वत्र शेती बहरण्याची शक्यता आहे. नांदेड व परिसरातही शुक्रवारी मध्यरात्री व आज मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.