नांदेड - शहर व जिल्ह्यात बुधवारपासून (दि. 15 जुलै) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी साचले असून अनेकांच्या घरातही पाणी घुसल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे पहिल्याच जोरदार पावसात पालिकेचे पितळ उघडे पडले आहे. जिल्ह्यात सरासरी ३७.८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
शहर व जिल्ह्यात बुधवारपासून पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सर्वात जास्त ८० मि. मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी पावसाची नोंद हदगाव तालुक्यात ५.५७ मि. मी. झाली आहे. पावसाळापूर्व योग्य ती खबरदारी महापालिकेने घेतली नाही. नांदेड शहरातील हिंगोली गेटच्या अंडरब्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्य पहायला मिळाले. या पाण्याचा अंदाज आला नसल्याने एका कार चालकाने त्यातून कार नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने कार आपोआप लॉक झाली. त्यामुळे काही काळ इथे कार बुडण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, काही जागरूक नागरिकांनी तातडीने क्रेनला बोलावून ही कार पाण्याबाहेर काढली. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, दरम्यान, दरवर्षी या ठिकाणी काही न काही दुर्घटना घडत असते, मात्र त्यावर काहीही तोडगा महापालिकेला काढता आलेला नाही. त्यामुळे पहिल्याच जोरदार पावसात महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे.