नांदेड - गेले काही दिवस हवेत तीव्र उष्मा वाढला आहे. त्यामुळे उकाडाही जाणवत आहे. सध्या शहरात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे रस्तेही ओस पडले आहेत. सगळे व्यवहार ठप्प आहेत. अशातच जिल्ह्यातील कंधार मुखेड तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या अचानकपणे आलेल्या गारपिटीने तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यातील कंधार व मुखेड तालुक्यातील परिसरात आज सायंकाळच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली . हा पाऊस 2 तास सुरू होता. त्यामुळे हळद काही प्रमाणात हरभरा, गहू, उन्हाळी मूग, ज्वारी, भुईमूग या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. या अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.