हिमायतनगर (नांदेड) - हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात बुधवारी (दि. 24 जून) पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. त्यामुळे कोमेजू लागलेली पीके वाचण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसात पेरणी सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात पेरणी झाली त्या शेतकऱ्यांची पिके निघाली, तर मध्येच पावसाचा खंड पडल्यामुळे काही पीके जमिनीतच होती. आठ दिवस पाऊस गायब झाल्यामुळे पीके धोक्यात आली होती. कापूस माना टाकत होता तर सोयाबीन कोमेजून जात असल्याने शेतकरी चिंतातूर होते. बुधवारी (दि. 24 जून) दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत. पावसामुळे नाले ओसंडून वाहू लागले आहेत. हिमायतनगर तालुक्यात शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा जास्त प्रमाणात केला आहे.
पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसात पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीन कंपन्याच्या बोगस बियाण्यांचा परिणाम असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
यातच आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पीके माना टाकत होती. बुधवारी दुपारी तीन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे छोटे नदी-नाले वाहू लागले. तर काही गावातील नाल्यांचे पाणी घरात घुसले आहे. सायंकाळी पाचपर्यंत पाऊस सुरूच होता.
हेही वाचा - सोयाबीन उगवण न झालेल्या क्षेत्रात आपत्कालीन पीक व्यवस्थापन करावे - जिल्हाधिकारी