नांदेड - बुधवारपासून जिल्ह्यात अनेक तालुक्यात दमदार तर कुठे रिमझिम पाऊस बरसला. यामुळे नांदेड शहरासह सखल भागात पाणी साचले आहे. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी रात्री जिल्हाभरात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळीही जिल्ह्याच्या अनेक भागात धो-धो पाऊस बरसला. तर अनेक ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर मुखेड तालुक्यातील नदी नाल्यांना पहिल्याच पावसात पुर आल्याचे दिसून आले. दरम्यान, पाऊस सुरु असताना विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रमाणही वाढले होते.
शहरातील अनेक भागात रात्रभर वीज पुरवठा बंद होता. तर गुरुवारी सकाळपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीज पुरवठ्यात सारखा व्यत्यय येत होता. दमदार झालेल्या पावसामुळे शेतकरी आता बियाणे खरेदीसाठी पैश्यांची तजवीज करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या समाधानकारक पाऊस झाला असला तरीही पेरणी योग्य नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.