नांदेड - दिवसेंदिवस जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य धोक्यात येत असून सेंद्रिय कर्ब ०.३० टक्क्यांपेक्षा खाली आले आहे. यामुळे जमिनी नापिक होवून उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या सोबतच आल्कधर्मी जमिनीचे प्रमाण वाढून स्फुरदाचे प्रमाणही घटत असल्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा संतुलित वापर करुन सेंद्रीय खताचा वापर करावा लागणार असल्याचे मतही शेती तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
माती परीक्षणाचे तपासले सहा हजार नमुने-
मराठवाड्यातील सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात जमिनीतील आरोग्य धोक्यात आल्याची बाब माती परिक्षणातून ही पुढे आली आहे. येथील माती परिक्षण प्रयोग शाळेत २०१९- २० मध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा हजार ५१४ शेतकऱ्यांच्या माती नुमन्याचे मोफत परिक्षण करुन त्यांना जमिन आरोग्य प्रत्रिकेचे वाटप करण्यात आले. यात मुख्य अन्नद्रव्य - नत्र, स्फुरद, पालाशचे सहा हजार १०५ नमुने तर लोह, तांबे, जस्त, मॅग्नीज या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे ४०९ नमुने तपासुन समिनीची सामु, क्षारता व सेंद्रीय कर्बाची तपासणी करण्यात आली. यात तीन हजार ५६० नमुन्यात सेंद्रीय कर्बाचे प्रमाण ०.३० टक्क्यांच्या खाली तर दोन हजार ५०६ नमुने मध्यम प्रमाणात आले . केवळ ३९ नमुन्यात सेंद्रीय कर्बाचे प्रमाण अधिक आढळले.
यासोबत मुख्य अन्न घटक असलेले स्फुरदचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. सहा हजार १०५ मातीच्या नमुन्यापैकी चार हजार ८५३ नमुन्यात स्फुरदचे प्रमाण कमी आढळले आहे. या भागात आम्लधर्मी जमिनीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. यासोबतच सुक्ष्म अन्नद्रव्याच्या ४०९ नमुने तपासणीत लोहाचे प्रमाण कमी आले आहे. तर झिंक, मॅग्नीज व कॉपरचेही प्रमाण मध्यम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात-
कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रासयानिक खतांचा वापर केला जात आहे. मोठ्याप्रमाणात किटकनाशके आणि तणनाशकांचाही वापर केला जात आहे. परिणामी जमिनीची प्रत खालवली आहे. तसेच सेंद्रीय खते , हिरवळीचे खते , कुजलेले शेणखत , जैविक खतांची कमतरता यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आल्याने शेतकऱ्यांना पुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
सेंद्रीय कर्ब म्हणजे काय ?
जमिनीची सुपिकता म्हणजेच सेंद्रीय कर्बाचे योग्य प्रमाण मानले जाते. जमिनीत ०.४१ ते ०.८० टक्के सेंद्रीय कर्बाचे प्रमाण असणे आवश्यक असते. हे प्रमाण ०.३० टक्क्यांच्या खाली आले तर जमिन पिक घेण्या योग्य नसल्याचे मानले जाते. सेंद्रीय खते, हिरवळीचे खते, कुजलेले शेणखत, जैविक खतांची मात्रा योग्य प्रमाणात दिल्यास सुपिकता वाढेल , असे तज्ज्ञांचे मत आहे.