नांदेड - देशाचे पंतप्रधान समाजात एकोपा राहण्यासाठी प्रयत्न करणारे असतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदू - मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केले. भाजपच्या काळात जाणीवपूर्वक मुस्लिम धर्मीयांबद्दल अन्याय केला जात आहे. मुस्लिम समाज काय खातो इथपासून ते मुस्लिम धर्मीयांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचे आझाद म्हणाले.
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ पिरबुऱ्हाण व देगलुरनाका येथे आयोजित जाहीर समेत आझाद बोलत होते. यावेळी आझाद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा चुकीच्या पध्दतीने धर्मांधता वाढविणारी आहे. अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे चांगले नेते भाजपने दिले. मात्र, मोदी प्रणित भाजप सरकार केवळ स्वार्थासाठी राजकारण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हैदराबादचा धर्मांध नेता खासदार असुद्दीन ओवेसी धर्मांधतेचे विष कालविण्याचे काम करत आहे. त्यांनी केलेली वंचित आघाडीसोबतची जवळीक भाजपला मदत करणारी आहे. भारतीय जनता पार्टी एकटी नसून त्यांना मदत करणारे ओवेसीसारखे लोक आहेत. हा धोका ओळखून अशोक चव्हाण यांना विजयी करावे, असे आवाहन यावेळी गुलाम नबी आझाद यांनी केले.
यावेळी खासदार अशोक चव्हाण, आ. डी. पी. सावंत, आमदार आसीफ शेख, माजी महापौर अब्दुल सत्तार, सभापती फारूखअली खान, माजी सभापती मसूद खान, माजी उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, अॅड. बारी सिद्दीकी आदी मान्यवर उपस्थित होते.