नांदेड - कोरोनाला मात देण्यासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भोकर मतदारसंघातील तहसील कार्यालयात बैठक घेतली. ग्रामीण रूग्णालय व ट्रॉमा केअर युनिटची पाहणी करून आरोग्य सुविधांसंदर्भात त्यांनी यावेळी सूचना केल्या. त्याचप्रमाणे विविध स्वयंसेवी संस्थांकडून संकलित करण्यात आलेल्या धान्याचे वाटपही त्यांच्या हस्ते गरजूंना करण्यात आले.
जिल्ह्यातील कोरोना संदर्भात परिस्थितीचा अशोक चव्हाण दररोज आढावा घेत प्रशासनास अनेक सूचना करत आहेत. आज (शनिवारी) त्यांनी भोकर मतदारसंघ शहर व तालुक्यातील कोरोना संदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यासोबतच त्यांनी प्रशासनास काही महत्वपूर्ण सूचना केल्या.
यामध्ये प्रत्येक रेशन कार्डधारकाला शासकीय योजनेप्रमाणे धान्याचे वाटप करणे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा गरजू व गरीब व्यक्तींना स्वयंसेवी संस्था आणि समाजातील दानशूर नागरिकांकडून संकलित करण्यात आलेल्या धान्याचे वाटप करण्यात यावे, शहर व तालुक्यातील नागरिकांना गरजेनुसार तत्काळ आरोग्य सेवा पुरविण्यात यावी, कोरोना सदृश्य रूग्णांची तपासणी करून गरज भासल्यास त्यांचे विलगीकरण करण्यात यावे, कोरोना राष्ट्रीय आपत्ती समजून प्रत्येक नागरिकाने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार भरत सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, यांची उपस्थिती होती.