नांदेड - जिल्ह्यात लॉकडाऊनचा फायदा घेत अनेक दुकानदार नफाखोरी करत असल्याची माहिती आहे. अशातच, दुकानात वस्तू खरेदीस गेलेल्या ग्राहकाने किराणाचा जादा भाव का लावला अशी विचारणा केल्याने किराणा दुकानदाराने ग्राहकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शहरातील आशीर्वादनगर भागातील रहिवासी श्याम केंद्रे हा तरुण गिरीराज किराणा स्टोअर्सवर गुरुवारी रात्री ८ वाजता किराणा खरेदीसाठी गेला होता. तेव्हा दुकानदार प्रमोद श्रीरामवार याने किराणाचा भाव जादा लावल्याने त्याबाबत श्यामने विचारणा केली असता दुकानदार संतापला. प्रमोद व त्याच्या दोन साथीदारांनी तू कोण विचारणार, असे म्हणून शिवीगाळ करत कापड बुक्क्या मारल्या. तसेच एकाने लोखंडी कड्याने डोळयावर मारून जखमी केले.
नांदेड शहर व जिल्ह्यातील अनेक भागात लॉकडाऊनच्या काळात किराणा जीवनावश्यक वास्तूंची सर्रासपणे ज्यादा दराने विक्री केली जात आहे. अनेक दुकानदार नफेखोरी करत असल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. व यावर प्रशासनाने लक्ष देऊन सर्वसामान्य लोकांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी आता नागरिक करीत आहेत. याबाबत केंद्रे याने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, घटनेचा पुढील तपास पोलीस जमादार गायकवाड हे करीत आहेत.