नांदेड - भारतीय सैनिक कधीच सुट्टीवर नसतो याचा प्रत्यय सध्या नांदेडकरांना येत आहे. भारतीय लष्कराच्या इंजिनिअरिंग रेजिमेंटचा जवान प्रवीण देवडे हा काही दिवसांपूर्वी घरी सुट्टीवर आला होता. सुट्टी संपण्यापूर्वी देशभर लॉकडाऊन जाहीर झाले. रेजिमेंटमधून प्रवीणला घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले. पण, घरी प्रवीणला बेचैनी होत होती. देशात आलेल्या या संकटकाळात आपण काहीतरी देशासाठी केलेच पाहिजे ही भावनेने रेजिमेंटमधील मित्रांना व्हाट्स अॅपच्या माध्यमातून त्याने संपर्क केला. यातून अनेक सैनिकांनी आर्थिक मदत केली. या पैशातून आता सैनिक प्रविण देवडे हा नांदेड शहरातील गरिबांच्या वस्तीत जाऊन आवश्यक धान्य, भाजीपाला, फळे यांचा मोफत पुरवठा करत आहे.
जिल्ह्यातील जे लोक सैन्यदलात कार्यरत आहेत त्या सर्वांनी यथाशक्ती या उपक्रमास मदत केली. खरंतर सैनिक प्रवीण दराडे हा जास्तीची सुट्टी मिळाली म्हणून आपल्या परिवारासोबत आनंदी राहू शकला असता पण ज्याने आयुष्यभर भारत मातेच्या सेवेची शपथ घेतली आहे, तो अशा संकटात शांत कसा बसेल. या उपक्रमासाठी जी मदत मिळतेय ते सांगताना सैनिक देवडे याला प्रचंड गहिवरून आले होते. कारण त्याच्या शाळेतील, महाविद्यालातील अनेक मित्र त्याला मदत करत आहेत. तसेच ज्यांची चेहरे त्यांनी आजपर्यंत पाहिले नाही तेही मदत करत असल्याचे सांगितले.
हेही वाचा - वाहतूक नियमांचे उल्लंघन, विनाकारण घराबाहेर; दहा दिवसात 53 लाखांचा दंड वसूल