नांदेड - शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील सहा महिन्यांच्या एक बालकाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर, डॉ. पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 4 बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 186 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आज नांदेड शहरातील सुंदरनगर येथील 23 वर्षाचा एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 297 झाली आहे.
जिल्ह्यातील आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 48 अहवालांपैकी 47 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या 98 बाधितांवर उपचार सुरु आहेत. यातील 52 वर्षांची एक महिला तसेच 52 व 54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 13 आहे.
नांदेड जिल्ह्यात 98 बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 18, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 61, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 13 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. शुक्रवारी आणखी 87 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त होईल.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती -
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 751
घेतलेले स्वॅब- 5 हजार 604
निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 888
आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण - 1
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 297
आतापर्यंतची मृत्यू संख्या- 13
कोरोनामुक्तांची संख्या- 186
सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण- 98