नांदेड: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नांदेड विभागीय केंद्रामार्फत देण्यात येणारा पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार हिंगोली येथे कार्यरत उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांना जाहीर झाला आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी तुषार गांधी यांच्या हस्ते त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे.
प्रशांत कैलास खेडेकर हे हिंगोलीच्या कळमनुरी येथे कार्यरत आहेत. त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नांदेड विभागीय केंद्रामार्फत देण्यात येणारा पहिला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांचे पणतू, जेष्ठ गांधी अभ्यासक तुषार गांधी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी माजी शिक्षणमंत्री तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नांदेड विभागीय केंद्राचे अध्यक्ष कमलकिशोर कदम उपस्थीत रहाणार आहेत. पंधरा हजार रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती विभागीय केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.