नांदेड - प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका धावत्या रिक्षाला अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवून वेळीच आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शहरातील आयटीआय परिसरात हा प्रकार घडला.
शिवाजीनगर येथून श्रीनगरकडे प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा (एमएच २६, एन. ४६९१) आयटीआय परिसरात आली असता तीने अचानक पेट घेतला. रिक्षाने पेट घेतल्याचे लक्षात येताच रिक्षातील प्रवाशांनी तत्काळ बाहेर उड्या घेतल्या आणि रिक्षाची आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रस्त्याच्या मधोमध ही घटना घडल्याने आयटीआयकडून श्रीनगरकडे जाणारी वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती. आजूबाजूच्या फेरीवाल्यांनी आपले बस्तान तेथून हलवले.
नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवून पाणी आणि वाळू टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. १५ मिनिटे आगीचा हा थरार होता. आग लागल्यावर काही जणांनी अग्निशामक दलाला फोन केला मात्र, अग्निशामक दल येईपर्यंत नागरिकांनी आग विझवली होती. या आगीमळे रिक्षाचा पेट्रोल टँक व बॅटरीचे मोठे नुकसान झाले. आग काही वेळ सुरू राहिली असती, तर रिक्षाचा स्फोट झाला असता असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.