नांदेड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात विविध नियम लागू केले आहेत. नांदेड-वाघाळा शहर महापालिका क्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज दुसऱ्या दिवशी सहा दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 19 व 20 मे या दोन दिवसात शहरातील 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. व्यवसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन नांदेड-वाघाळा शहर महापालिकेने केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शहरातील दुकाने सुरू करण्याची सशर्त परवानगी दिली. तर काही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निश्चित केलेल्या नियम व अटी न पाळणाऱ्या दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआयुक्त विलास भोसीकर व सुधीर इंगोले यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवारी (ता. 20) या पथकाने गुरुकृपा कलेक्शन रविनगर चौक कौठा, अपना ड्रेसेस वजिराबाद, लक्ष्मी कापड श्रीनगर नांदेड, मयूर मेन्स वेअर (आनंदनगर) या दुकानांना परवानगी नसताना दुकाने उघडल्याबद्दल दंड लागू केला. तसेच, आर. सी. एफ शॉपर्स मार्ट श्रीनगर नांदेड, महालक्ष्मी ऑईल शोरुम (आनंदनगर) यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोक जमविल्यामुळे दंड आकारला. तर, बालाजी किराणा ॲन्ड जनरल स्टोअर्स (सिडको) यांनी निर्धारित वेळेवर दुकाने बंद न केल्याने महालिकेच्या पथकाने दंडवसुली केली. या सातही दुकानांना प्रत्येकी 5 हजार रुपये असा एकूण 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
याआधी मंगळवारी (ता. 19) या पथकाने नांदेड शहरातील सहा व्यवसायिकांनी सुरक्षित अंतर न ठेवणे, दुकाने उघडण्याची परवानगी नसताना दुकाने उघडणे, ठरवून दिलेल्या वेळेत दुकाने बंद न करणे यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 30 हजार रुपये दंड वसूल केला. दोन दिवसात एकूण 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विलास भोसीकर, सुधीर इंगोले यांच्या पथकाने रमेश चवरे, औकार स्वामी, अशोक भांगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.