नांदेड - जिल्ह्यात असलेल्या १११ जलप्रकल्पांत केवळ २५.९३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यात दोन मोठ्या प्रकल्पांपैकी विष्णूपुरी प्रकल्पात २१.४१ टक्के तर मानार प्रकल्पात २३.४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर जलसंकट डोकावत असून हे संकट कसे दूर करावे, याची चिंता प्रशासनाला लागली आहे.
जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प, ९ मध्यम प्रकल्प, आठ उच्च पातळी बंधारे, ८८ लघु प्रकल्प आणि ४ कोल्हापुरी बंधारे आहेत. या संपूर्ण प्रकल्पांची क्षमता ८०४.६२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या प्रकल्पांमध्ये सद्यास्थितीला केवळ १८७.९१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याची टक्केवारी ३५.७६ टक्के इतकी होती.
नांदेड शहरात आज घडीला आठ दिवसांआड पाणी पुरवठा सुरू आहे. मे अखेरपासूनच नांदेड शहरात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे जायकवाडी वगळता नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारे इतर पर्यायी प्रकल्पही कोरडेच आहेत. गोदावरी पात्रासह तब्बल १२ बंधारे कोरडे आहेत. त्यामुळे जायकवाडीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. याबाबत अद्याप प्रशासनाचा कोणताही निर्णय झालेला नाही.