नांदेड - मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने जन्मदात्याने मुलीलाच संपवल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील जामखेड गावातील ही घटना आहे. गावातील बालाजी देवकते या शेतकऱ्याने आपल्या 18 वर्षाच्या सिंधू या मुलीची सोयरीक जुळवली होती. मात्र लग्नासाठी पैश्याची जुळवाजुळव होत नसल्याने बालाजी हतबल झाले होते. त्यातून निराश झालेल्या बालाजीने संतापाच्या भरात शिवीगाळ करत पत्नी आणि मुलीच्या डोक्यावर लाकडाने मारहाण केली, त्यात मुलीचा मृत्यु झाला. याप्रकरणी मृत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुखेड पोलिसात जन्मदात्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
लग्नाची सुरु होती बोलणी - मुखेड तालुक्यातील जामखेड येथील बालाजी विश्वांभर देवकते (वय, ४०) यांना पाच एकर शेती असून पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. गेल्या वर्षांपासून ते आर्थिक अडचणीत होते. त्यांची मुलगी सिंधू देवकते (वय, १८) हिच्या लग्नाची बोलणी सुरू होती. परंतु लग्नाची तारीख काढण्यात आली नव्हती. लग्नासाठी पैसे कुठून आणावेत म्हणून चिंतेत होते.
लग्नाचा विषय निघताच केली मारहाण - १९ एप्रिल सकाळी ११ वाजताच्या दरम्यान बालाजी देवकते हे घरी आले. घरी लग्नाचा विषय निघाला. त्यावेळी मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणू? त्यासाठी काय शेती विकू काय? असे म्हणत बाजेच्या ठाव्याने (लाकडाने) मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलगी अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडली. मुलगी सिंधू चा जाग्यावरच मृत्यू झाला. यावेळी सिंधूची आई अहिल्याबाई यांनी मध्यस्थी केली असता तिलाही मारहाण केली असता त्याही गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर आरोपी बालाजी देवकते हा पसार झाला आहे.
मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, उपनिरीक्षक नरहरी फड, गजानन अनसापुरे, जाधव, पोलीस जमादार सुनिल पांडे, गंगाधर चिंचोरे, शिवाजी आडबे, सिद्धार्थ वाघमारे, फेय्याज शेख घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी मयत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुखेड पोलिसात जन्मदात्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.