नांदेड - मृग नक्षत्रातील पाऊस पिकासाठी उपयुक्त असतो, असे शेतकरी मानतात. मात्र, मृग नक्षत्राला १० दिवसापूर्वीच सुरूवात होऊनदेखील पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे आणखी काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
पावसाने अद्याप हजेरी लावली नाही. दुसरीकडे पेरणीपूर्व मशागत करून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, सध्या कडक ऊन पडत असल्याने कृषी बाजारपेठेत काही प्रमाणात शुकशुकाट दिसत आहे. शासनाने पाऊस येईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. येत्या एक-दोन दिवसांत पेरणीयोग्य पाऊस झाला तर पेरणीला सुरूवात होईल. मात्र, मृग नक्षत्र कोरडे जात असल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत १० दिवसांपूर्वी वादळी वाऱ्याने कहर केला होता. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर मात्र, मान्सूनची वाटचाल रखडल्याने शेतकऱ्यांना आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसत आहे.