नांदेड- ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून मुखेडमध्ये कृषिमंत्री दादा भुसे यांचा ताफा अडवण्यात आला. मंत्री भुसे हे अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी नांदेड दौऱ्यावर आले आहेत. मुखेड येथील शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. यावेळी भुसे यांनी गाडीतून उतरून मागण्यांसंदर्भात निवेदन घेत पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करू, अशी शेतकऱ्यांना ग्वाही दिली.
मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. मूग, उडीद, पिकांसोबतच सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे, शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. नांदेड तालुक्यातील पिकांची पाहणी केल्यानंतर ते मुखेड तालुक्यात पोहोचले. मात्र, संतप्त शेतकऱ्यांनी दादा भुसे यांचा ताफा अडवला.
पीकविमा मंजूर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, अशा घोषणा शेतकऱ्यांतर्फे देण्यात आल्या. यावेळी भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांची समस्या जाणून घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले. आज शेतीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सरकार लवकरच शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.
हेही वाचा- दारूसाठी कायपण.. बेळगावात दारू खरेदीसाठी मद्यपीने पुराच्या पाण्यात घेतली उडी