नांदेड - अस्वलाने केलेल्या हल्ल्यात शेतकरी तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी किनवट तालुक्यातील चिखली (बु.) शिवारात घडली आहे. शेख जावेद शेख मुबारक (वय २५), असे जखमी तरुणाचे नाव आहे. अस्वलाच्या या हल्ल्यात जावेद यांच्या डोळ्यासह चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
नेहमीप्रमाणे दुपारी दोनच्या सुमारास जावेद चिखली येथील शिवारात गेले होते. कपाशीच्या पिकाची पाहाणी करत असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला. जखमी अवस्थेत जावेद यांनी त्यांच्या मित्रासोबत मोबाईलवरून संपर्क साधला. जावेद यांच्यावर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारांसाठी त्यांना तातडीने तेलंगाणाच्या आदिलाबाद येथे हलवण्यात आले.
हेही वाचा - बिबट्याचा हल्ल्यात २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी; मुरबाड तालुक्यातील घटना
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वतीने जावेद यांच्यावर उपचारासाठी ५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. दरम्यान, शेतांमध्ये सध्या कापूस, तूर ही पीके वाढल्याने अस्वल, रानडुक्कर आदी प्राण्यांचा वावर वाढला आहे. या घटनेमुळे शेतकरी, शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण आहे.