नांदेड - रासायनिक खत फवारणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जास्त येतो. त्या तुलनेत जमिनीचा कसही कमी होतो. रासायनिक खतांच्या वापरामुळे पिके, पालेभाज्या विषजन्य निर्माण झाल्याने हानिकारक ठरत आहेत. यावर उपाय म्हणून मालेगाव येथील भगवान रामजी इंगोले यांनी शेतात जैविक खत व फवारणी औषधाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा - सततच्या त्रासाला कंटाळून महिला सुरक्षा रक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न; विष्णूपुरीतील घटना
इंगोले यांनी रासायनिक खतांचा वापर हळदी पिकासाठी टाळला असून, त्यांनी बायोअमृत खत घरच्या घरी तयार केले आहे. हे खत तयार करताना त्यांनी 200 लिटर पाण्याची प्लास्टिक टाकी, 100 किलो गाईचे शेण, गोमूत्र 20 लिटर, 2 किलो गूळ, 2 लिटर दूध, 200 ग्राम तूप, 2 किलो चनाडाळ, बुरशी ( ट्रायकोडर्मा, मेटरिझम ) 5 किलो यांचे मिश्रण 15 दिवस काठीने हलवून केले. ही फवारणी महिन्यातून 1 किंवा 2 वेळेस करता येते. बायोअमृत जीवामृत स्लरी या खतामुळे पिकांवरील करपा, हुमनी अळीचा संपूर्ण नायनाट होऊन इतर किडीचाही प्रादुर्भाव कमी होत आहे. व यासाठी केवळ 1 हजार 500 ते 2 हजार रुपये खर्च येतो.
हेही वाचा - नांदेड महापालिकेत अपहार; लिपीकाविरुद्ध गुन्हा दाखल
शेतकरी भगवान इंगोले यांनी त्यांच्या शेतात 'दशपाणी अर्क' हे विविध प्रकारच्या वस्तू व वनस्पतीचे पाणी वापरुन तयार केले आहे. यासाठी त्यांनी 200 लिटर पाण्याची प्लास्टिकची टाकी, हिरव्या मिरच्याचा कुटलेला 2 किलो ठेचा, 2 किलो गायीचे शेण, 5 लिटर गोमूत्र, दीड ते 2 किलो अद्रक, अर्धा किलो हळद, 5 किलो कडुलिंबाची पाने, 3 किलो धोतऱ्याची पाने, निरगुडे पाने, प्रत्येकी 2 किलो रुचकीची पाने बेशरमाची पाने, कनेरीची पाने, गुळवेल पाने, सीताफळांच्या पानांचे मिश्रण करुन 1 महिना ते ड्रममध्ये ठेवले. याची कापसाच्या पिकावर 200 मिलीमध्ये 15 लिटर फवारणी होते.
इंगोले यांनी तयार केलेल्या दशपाणी अर्कमुळे बोंडअळी, मावा, तुडतुडे, रसशोषणाच्या किडींचा नायनाट होण्यास मदत झाली. परभणीच्या कृषी विद्यापीठानेही याचा नमुना संशोधनासाठी घेऊन गेले आहेत.