नांदेड - राज्य शासनाने 'ब्रेक दि चेन' अंतर्गत 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काही अतिरिक्त निर्बंध लागू करून संपूर्ण जिल्ह्यात 1 जून च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकाडाऊनचा कालावधी वाढविला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसहित नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ग्रामीण बाजार व कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विशेष निगराणी ठेवावी. अशाठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असेल तर हे ठिकाणे बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच दूध संकलन, वाहतूक प्रक्रिया निर्बंधांशिवाय चालू राहतील. परंतु अत्यावश्यक वस्तूंचे व्यवहार किंवा होम डिलिव्हरीवर जी बंधने लागु असतील त्या बंधनांसह किरकोळ विक्रीस परवानगी राहणार आहे. कोरोना व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या औषधांशी संबंधित वस्तू किंवा उपकरणे यांच्या वाहतुकीशी संबंधित प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच स्थानिक आपत्ती प्राधिकरण आवश्यक असल्यास विशिष्ट भागांकरिता काही निर्बंध लावू शकेल, पण त्यापूर्वी उपविभागीय प्राधिकरणास 48 तासांपूर्वी सूचना देणे आवश्यक असेल.