नांदेड - देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ पीठ म्हणून तीर्थक्षेत्र माहूरची ओळख आहे. पौरोणिक ग्रंथात कोरी भूमी असा उल्लेख असलेल्या या माहुरला निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली. कोरोनामुळे यंदा पर्यटक निसर्ग सौंदर्याचा अविष्कार इथे येऊन पाहू शकत नाहीत. त्यामुळे खास ईटिव्ही भारतच्या दर्शकांसाठी खास रिपोर्ट...
मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या शेकडो दुकानांना कुलुपच आहे. त्यामुळे पूजेचे साहित्य, फुलांच्या हारांचा अभाव जाणवत आहे. मात्र निसर्गाने इथं हिरव्या रंगाची मुक्त हस्ते उधळण केली. त्यातून हिरवा शालू नेसलयासारखी इथली धरती नटली आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. मात्र यंदा कोरोनामुळे इथे येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या चार महिन्यापासून मंदिर बंद असल्याने इथल्या दुकानंदारावर उपासमारीची वेळ आली आहे. रेणूका मातेच्या पायथ्याशी शेकडो दुकाने आहेत. ज्यातून किमान दोन हजार लोकांना कायमचा रोजगार मिळत होता. मात्र, कोरोनामुळे हे विक्रेते आता मेटाकुटीला आले आहेत.
यापूर्वी अगदी प्लेगच्या साथीच्या वेळी माहुरचे मंदिर बंद नव्हते. कारण त्यावेळी प्लेगचा प्रादुर्भाव या प्रांतात फारसा झाला नव्हता. मात्र यंदा कोरोनामुळे सलग चार महिन्यापासून मंदिर बंद असल्याने भाविक मातेच्या दर्शनासह इथल्या निसर्ग सौंदर्याला मुकत आहेत. त्यातून रेणुकामातेलाच साकडे घालत कोरोनामुक्त करण्याची विनवणी भक्त करत आहेत.