नांदेड - डमी परीक्षार्थी बसवून अनेक जण शासकीय नोकरीला लागले आहेत. हा विषय राज्यभर चांगलाच गाजला होता. या प्रकरणाच्या अनुषंगाने मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमके काय आणि अजून किती मोठी रांग आहे हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणारे आहे.
नेमके काय आहे प्रकरण -
स्पर्धा परीक्षेत डमी परीक्षार्थी बसवून राज्यातील एमपीएससी, सरळसेवा भरती आणि विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून अनेक जण नोकरीला लागले. यात एक मोठे रॅकेट लाखो रुपयांचा कारभार करत होते. गेल्या चार वर्षांपासून हे सुरू होते.
गतवर्षी आले होते प्रकरण उघडकीस
साधारणतः एक वर्षापूर्वी मांडवी येथील योगेश जाधव या तरुणाने सुरुवातीला हे प्रकरण उघडकीस आणले होते. यात मांडवी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता. यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली.
अनेक जण खात आहेत तुरुंगाची हवा
या रॅकेटची मोठी व्याप्ती पाहता, हे प्रकरण औरंगाबाद सीआयडीकडे सुपूर्द झाले. याचा मुळापासून तपास केल्यानंतर अनेक म्होरके त्यांच्या हाती लागले. यात अनेकांना ताब्यात घेतले असून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. अद्यापही यातील बरेच जण तरुंगाची हवा खात आहेत.
या प्रकरणाशी निगडीत आणखी काही मासे गळाला
याच तपासाच्या अनुषंगाने आणखी प्रकरण उघडकीस आले. डमी परीक्षार्थींचा हा घोटाळा सन २०१५ मध्ये घडला होता. तो आता उघडकीस येत आहे. याच अनुषंगाने आणखी काही मासे गळाला लागले आहेत. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात २२ जानेवारी २०१५ रोजी लिपिक पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी निखिल शिरासिंग चौहाण हा मूळ उमेदवार होता. परंतु, त्याच्याऐवजी डमी परीक्षार्थी म्हणून परभणी कृषी विद्यापीठातील कर्मचारी अरविंद टाकळकर याला परीक्षेला बसविले.
या परीक्षेत निखील चव्हाण हा पास होऊन त्याला नोकरी देखील लागली. परंतु, डमी परीक्षार्थीची वाढलेली व्याप्ती पाहता अधिक चौकशीमध्ये लिपिक पदाच्या परीक्षेत झालेला गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद सीआयडीने औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या संचालकाशी पत्रव्यवहार केला.
वरिष्ठांच्या आदेशावरून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गोविंदसिंग गणपत सिंग पाटणूरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी निखिल चव्हाण, प्रबोध राठोड आणि अरविंद टाकळकर यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्ष पनि गोपीनाथ वाघमारे हे करत आहेत. मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले असून अनेकांचे प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस येण्याची शक्यता आहे.