नांदेड - कोरोनाची परिस्थिती आजच्या घडीला पूर्ण नियंत्रणात जरी असली तरी भविष्यातील स्थितीचा विचार करायला हवा. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जनतेला कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यादृष्टीने जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती ऐवजी उभारले जाणारे नवीन जिल्हा रुग्णालय हे चांगल्या सुविधांसह लवकर उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत बैठक झाली. या बैठकीत जिल्हा रुग्णालयाची नवीन संकुल अधिकाधिक चांगले कसे करता येईल याबाबत पालकमंत्री चव्हाण यांनी संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा केली. आजच्या घडीला यातील बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या इतर इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नव्याने उभारले जाणारे रुग्णालय हे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अधिकाधिक चांगल्या दर्जाचे कसे होईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार थांबावा, त्याची साखळी तुटावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाला संचारबंदीचा निर्णय अत्यावश्यक वाटल्याने तसा निर्णय घेतलेला आहे. जनतेने संचारबंदीचे पालन करून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आजवर अतिशय चांगले सहकार्य केले असून, यापुढेही कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सर्वजण आपआपली व्यवस्थीत काळजी घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे आदी अधिकारी उपस्थित होते.