नांदेड - शहर इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळू भगवान चोपडे (वय २९) यांना २० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'दोषींनी कायदेशीर प्रकियांचा विनोद करून ठेवलाय'
तक्रारदाराच्या मुलाविरूध्द इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासह न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठवण्यासाठी चोपडे यांनी १ लाखाची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती. ३१ जानेवारीला पंचासमक्ष केलेल्या पडताळणीमध्ये चोपडे यांनी तक्रारदाराला पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले होते. यातील २० हजार रुपयांचा पहिला हफ्ता तक्रारदाराकडून स्वीकारताना वामनराव पावडे मंगल कार्यालयाच्या परिसरात चोपडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. चोपडे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'या घटना संशयास्पद, हल्लेखोरांचा बोलवता धनी कोण?'
ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी, पोलीस नायक दर्शन यादव, एकनाथ गंगातीर्थ, गणेश केजकर, विलास राठोड, अंकुश गाडेकर, मारोती सोनटक्के यांच्या पथकाने पार पाडली.