नांदेड - देगलुर नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱयाच्या घरी दही आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीस वाईट हेतूने पकडले. याप्रकरणी कर्मचाऱयावर बाल-लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत मार्तड संगमकर असे त्या आरोपी कर्माचाऱ्याचे नाव आहे. देगलूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शनिवारी ही घटना सकाळी १० वाजून ३० मिनिटाच्या सुमारास होट्टलबेस भागात घडली. शहरातील होट्टलबेस भागात राहणारी १५ वर्षाची मुलगी आजीच्या सांगण्यावरून गल्लीतीलच देगलूर नगरपरिषदेतील वादग्रस्त कर्मचारी हनुमंत मार्तड संगमकर (वय ५०) याच्या घरी गेली होती. त्यावेळी संगमकर घरी एकटाच होता. त्याने मुलीला 'वर ये तुला दही देतो' म्हणत त्या मुलीस वाईट हेतूने पकडले. तेथून सुटका करुन घेत धावतच मुलीने घर गाठले. घडलेल्या प्रकरणावरून होट्टलबेस भागात मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपी हनुमंत संगमकर याच्याविरोधात देगलूर पोलीस ठाण्यात कलम ३५४ भादवि व कलम ८,१२ (बाललैगिंक अत्याचार) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी याप्रकरणी स्वत: लक्ष घातले होते. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते करत आहेत.