नांदेड - माणसाच्या मृत्यूनंतर आपल्या समाजात विविध धार्मिक विधींना महत्त्व असते. त्यातून पुढे येणाऱ्या कर्मकांड आणि विधींवर हजारो रुपये खर्च केला जातो. परंतु, या सर्व प्रकाराला फाटा देत आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळा डिजिटल करण्यासह विविध समाजोपयोगी कार्यावर जवळपास लाख रुपये खर्चून समाजासमोर आदर्श घालून देण्याचे काम पुयणी येथील दीपकराव पावडे यांनी केले आहे.
हिंदू धर्मात दशक्रिया, तेरवे विधी, गोड जेवण, पिंडदान, अस्थिविसर्जन आणि वर्षभराने येणारे श्राद्ध अशा विविध कार्यावर लाखो रुपये खर्च होतो. परंतु, कोरोना महामारीमुळे तेरवीसह तत्सम कार्यक्रमांवर होणारा अनाठायी खर्चाला फाटा दिला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नांदेड तालुक्यातील पुयणी येथील माणिकराव संभाजीराव पावडे (वय ९७) यांचे १२ सप्टेंबर रोजी निधन झाले.
पुयणीसह पंचक्रोशीत प्रतिष्ठित असलेल्या माणिकराव पावडे यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात या उद्देशाने त्यांचे चिरंजीव दीपक पावडे यांनी त्याचे कोणतेही उत्तरविधी न करता सर्व खर्च समाजोपयोगी कार्यावर केला. यामध्ये पुयणी येथील जिल्हा परिषद शाळेस त्यांनी दोन मोठ्या एलईडी टीव्ही, प्रोजेक्टर, डिजिटल बोर्ड यासह ५१ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य खरेदी करून दिले.
नवीन मोंढा भागात होत असलेल्या मराठा मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी २१ हजार रुपयांचा धनादेश समितीकडे सुपूर्द केला. त्याचबरोबर गजानन महाराज मंदिर परिसरात असलेल्या संध्याछाया वृद्धाश्रमात (रुस्तुमजी मेवावाला) येथे अन्नदानाचा कार्यक्रम घेऊन तीन महिने पुरेल एवढे किराणा आणि धान्य वृद्धाश्रमासाठी दिला आहे. दीपकराव पावडे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. तसेच तेरवी, श्राद्ध, लग्नसमारंभ, वाढदिवस यावर अनाठायी खर्च करणाऱ्यांसाठी त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे