नांदेड - कुटुंबातील सदस्यांची जीवन विमा पॉलिसी काढायची आहे, असे आमिष दाखवत ग्राहकानेच विमा एजंटला लुटल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. हदगाव तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथील विमा एजंट लक्ष्मण कचरु वाठोरे (७०) यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली असून, त्यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा... जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांपैकी सहा भारतातील!
हदगाव तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथील भारतीय जीवन विमा एजंट लक्ष्मण कचरु वाठोरे यांना एका व्यक्तीने स्वतःचा व पत्नीची जीवन विमा काढायचा आहे, असे सांगितले. तसेच त्यांना तामसा परिसरातील पांगरी मार्गावरील एका शेतात बोलावले. वाठोरे हे त्या ठिकाणी गेले असता, त्यांना त्या अनोळखी व्यक्तीने शीतपेयामधून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे वाठोरे बेशुद्ध पडले. त्यानंतर त्या व्यक्तीने वाठोरे यांच्या बॅगेमधील २० हजार रुपये, हातातील सोन्याच्या अंगठ्या असा एकूण २४ हजारांचा ऐवज लंपास केला. वाठोरे थोड्यावेळाने शुध्दीवर आल्यावर त्यांना आपली लुटमार झाल्याचे समजले. त्यांनी त्यानंतर हदगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. हदगाव पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा... उस्मानाबादमध्ये वेळ अमावस्या उरकून परतणाऱ्या बैलगाडीला उडवले ट्रकने; चार जणांसह बैलांचा मृत्यू